२६ एप्रिल ची काळरात्र: भाग २ (उत्तरार्ध )


मुख्य अभियंते डिएटलॉव्ह रात्रपाळीच्या सहकाऱ्यांना सूचना देऊ लागले. दिवसपाळीच्या कर्मचाऱ्यांनी दुपारीच   ३२००मेगावॅट  च्या ताकदीची  भट्टी  १६०० मेगावॅट वर आणून स्थिर केलेली होती मात्र चाचणीसाठी ७०० मेगावॅट पर्यंत औष्णिक क्षमता घटवणे गरजेचे होते. रात्री अकराच्या सुमारास ऊर्जा घटवणे सुरु झाले, सगळे बोरॉन गज आत सरकवले होते आणि पाण्याचे पम्प पूर्ण क्षमतेने भट्टी मध्ये पाणी पुरवत होते. ऊर्जा एका विशिष्ट प्रमाणात कमी होत जायला हवी होती पण काहीतरी गडबड झाली होती. ऊर्जा अतिशय वेगाने घटत चालली. शेवटी तासाभराने ती ३० मेगावॅटला येऊन पोचली होती. इतक्या कमी उर्जेवर भट्टीमधून फिरणारे पाणी उकळणे अशक्य होते. मग जनित्रे चालणे तर दूरची गोष्ट. आता घाईघाईत अभिक्रिया वाढवण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यासाठी बोरॉनचे शोषक गज बाहेर खेचणे सुरु केले . झटपट ऊर्जा वाढवण्याच्या नादात २०० गजांपैकी फक्त ८ गज आत ठेवून बाकी सर्व बाहेर ओढले गेले. आता  गाभ्याची उष्णता  पुन्हा वाढू लागली. २००  मेगावॅट पर्यंत वाढ झाल्यावर चाचणी सुरु करण्याचा फर्मान सुटला. हि ऊर्जासुद्धा पुरेशी नव्हतीच पण कर्मचाऱ्यांचा नाईलाज होता. घड्याळाचा काटा रात्रीचे एक वाजून गेलेले दाखवत होता. वीजपुरवठा बंद झाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची आता  नक्कल करायची होती. त्यानुसार पाण्याचे पम्प बंद झाले. ते सुरु ठेवायला जनित्रांमधून पुरेश्या दबावाने वीज मिळते का हे चाचपणे आवश्यक होते.  पण आता भट्टीतील उष्णता झपाट्याने वाढत चालली! नियंत्रण कक्षात क्षणात वातावरण तंग झाले.  सर्वात शेवटचा उपाय होता एझेड-५ कळ दाबणे हा ! आपत्कालीन सुरक्षा प्रणालीचा भाग असलेली हि कळ सर्व बोरॉन गज एकाच वेळी भट्टीमध्ये ढकलते. परिणामतः सर्व न्यूट्रॉन्स झपाट्याने शोषले जाऊन अणुभंजन क्रिया थांबते. इथे मात्र हे एझेड-५ बटण काळाला निमंत्रण ठरले. ते दाबताक्षणी पुढच्या ३-४ सेकंदात पहिला हादरा बसला!! त्या मागोमाग झालेल्या दुसऱ्या प्रचंड  स्फोटाने परिसर हलवून सोडला. पहिल्या झटक्यात दोन हजार टन वजनाचे भट्टीला झाकणारे संरक्षक आवरण उडाले होते आणि त्यापुढील विस्फोटामध्ये ग्रॅफाइट गाभ्याच्या ठिकरया उडून आग, उष्णता आणि टनावारी आण्विक इंधन आसमंतात उधळले गेले. प्रिप्यात शहरातील नागरिकांवर अत्यंत घातक प्रमाणातील किरणोत्साराची काळी चादर ओढली गेली.

विस्फोटानंतर उघडा पडलेला गाभा
 परिणाम:

भट्टीजवळील हवेत किरणोत्साराचे प्रमाण घातक होते. चेर्नोबिल च्या आसपास कित्येक किलोमीटर पर्यंत हे प्रमाण मानवी शरीराला धोकादायक ठरेल इतके जास्त होते. आश्चर्य म्हणजे प्रिप्यातच्या नागरिकांना एवढ्या भयंकर घटनेपासून अनभिद्न्य.  ठेवले गेले. २६ तारखेचा दिवस त्यांच्यासाठी  नेहमीसारखा सुरु झाला होता. अपघाताची बातमी बाहेर पडून नाचक्की होऊ नये म्हणून गुप्तता पाळली जात असूनही १५०० किलोमीटर दूर स्वीडन मध्ये हवेतील किरणोत्सार वाढल्याचे लक्षात आले आणि त्याचे उगमस्थानाचा  तपास सुरु झाल्यावर हि दुर्घटना लपवणे अशक्य झाले. २७ तारखेच्या दुपारी प्रिप्यात रिकामे करण्यास सुरुवात केली गेली. ५०,००० लोकसंख्येचे शहर हा हा म्हणता ओस पडले. अणुभट्टी क्रमांक ४ ला लागलेली भयंकर आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक कर्मचाऱ्यांचा काही दिवसात 'तीव्र किरणोत्साराच्या आजाराने' (रेडिएशन सिकनेस) मृत्यू ओढवला. सुरुवातीला ३० किलोमीटर त्रिज्येचा प्रदेश रिकामा केला गेला. जवळजवळ दोन लाखाहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. त्यांना कल्पनाही नव्हती कि ते पुन्हा कधीच आपल्या घरी परतू  शकणार नव्हते. कालांतराने वर्जित क्षेत्राची व्याप्ती वाढवून २६०० चौरस किलोमीटर एवढी मोठी केली गेली. युरेनियमच्या अपघटनातून निर्माण होणारी  किरणोत्सारी मूलद्रव्ये ५०० वर्षाहून अधिक काळ वातावरणात टिकून राहू शकतात. दुष्परिणामांची यादी मोठी आहे. ती आकडेवारी माहिती करून घेण्यापेक्षा  आपण  मुळात त्या रात्री काय चुका झाल्या आणि त्यामागची वैज्ञानिक कारणमीमांसा समजून घेऊया. 

पूर्वार्धाचा सारांश:

या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या लहान लहान चुकांची बीजे खूप आधीपासून पेरली गेली होती. ती कशी ते पाहूच. पण आधी थोडक्यात या लेखातील पूर्वार्धात दिलेल्या माहितीचे एक आवर्तन करू. 

  • आरबीएमके भट्ट्या हे सोव्हिएत रशियाचे स्वतः विकसित केलेलं तंत्रज्ञान होते.
  • पूर्ण क्षमतेने काम करणार्या भट्टीची औष्णिक ऊर्जा क्षमता ३२०० मेगावॅट होती. 
  • चेर्नोबिल मध्ये असलेल्या चार भट्ट्या प्रत्येकी १००० मेगावॅट वीज उत्पादन करत होत्या.
  • भट्टीचा गाभा प्रचलित भट्ट्यांच्या मानाने भला थोरला होता. त्याची उंचीच ७ मीटर होती. 
  • अणुभट्टीमधे न्यूट्रॉन्सचा मारा करून युरेनियम-२३५ अणू विभाजित केला जातो. त्यामध्ये लहान अणू केंद्रक असलेली मूलद्रव्ये, २-३ न्यूट्रॉन्स आणि उष्णता निर्माण होते.
  • हे बाहेर पडलेले ३ न्यूट्रॉन्स पुढील युरेनियम अणू केंद्र्कांवर आपटून अभिक्रियेची साखळी सुरु ठेवतात.  
  • यातून निर्माण होणारी उष्णता पाण्याची वाफ बनवायला वापरली जाते. हि वाफ जनित्रे फिरवण्याच्या कामी येते ज्यातून विद्युतनिर्मिती होते. 
  • सर्व अणुभट्ट्यांमध्ये साखळी अभिक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शीतक(कुलण्ट), नियंत्रक (मॉडरेटर), आणि शोषक (ऍबसॉर्बर) असे तीन प्रमुख घटक असतात.
  • युरेनियमच्या इंधन गजांभोवती पाणी खेळवून इंधन आणि भट्टीचे शीतन केले जाते. 
  • नियंत्रक न्यूट्रॉन्सचा अतिप्रचंड वेग आटोक्यात आणून अणू विभाजनाला प्रोत्साहन देते. हे काम ग्रॅफाइट अथवा पाणी करते. 
  • अतिरिक्त निर्माण होत असलेले न्यूट्रॉन्स शोषक शोषून घेते आणि साखळी अभिक्रियेला आवर घालते. हे काम बोरॉनच्या कांबी  करतात. थोड्या प्रमाणात पाणीसुद्धा हे काम बजावते.
  • आरबीएमकेचा  गाभा भरीव ग्रॅफाइट विटांनी  बनलेला होता आणि त्या विटांमधील  उभ्या छिद्रांमध्ये झिर्कोनियम मिश्रधातूच्या २००० पोकळ नळकांड्यांत युरेनियमचे गज  बसवलेले होते. त्याभोवती पंपाने सतत पाणी खेळवले जात होते. (कल्पना करा कि श्रीखंडाच्या वड्या किंवा पॉपीन्स च्या गोळ्या एकावर एक ठेवून जशी कांब तयार होईल तशाच युरेनियमच्या वड्या एकावर एक ठेवून गज बनवतात आणि झिर्कोनियम च्या आवरणात बसवतात.)
  • इंधन गजांना समांतर उभे बोरॉनचे २०० शोषक गज संपूर्ण गाभ्यात बसवलेले होते. हे गज आत बाहेर सरकवण्याची स्वयंचलित यंत्रणा  कार्यान्वित होती.
  • जगातील सर्व अणुभट्ट्यांमध्ये शीतक आणि नियंत्रक दोन्ही कामे पाणी बजावते. काही प्रमाणात न्यूट्रॉन्स शोषकाचेही काम पाणी करते. या यंत्रणेमध्ये ग्रॅफाइट वापरले जात नाही. 
  • आरबीएमके भट्टीमध्ये पाणी शीतकाचे काम करते मात्र नियंत्रकाची जबाबदारी ग्रॅफाइट विटांचा गाभा करतो.
  • वरील मुख्य फरकामुळे जर अपघाताने पाणी पुरवठा खंडित झाला तर निर्माण होणारी परिस्थिती खालीलप्रमाणे :
    • सर्वसाधारण अणुभट्टीत अशा वेळी शीतक ( म्हणजेच पाणी ) गायब असल्याने आधी उष्णता वाढून उरलेल्या पाण्याची वाफ (व्हॉइड-पोकळी ) होईल. मग नियंत्रकाअभावी (पाण्याअभावी) न्यूट्रॉन्स अत्यंत वेगाने फिरू लागल्याने अणू  विभाजनाचे प्रमाण कमी होऊन उष्णता घटेल. बोरॉन गज न्यूट्रॉन्स शोषून विभाजन अभिक्रिया आणखी जास्त  मंदावतील. शास्त्रीय भाषेत हाच  'निगेटिव्ह व्हॉइड कोएफिशियंट' होय. म्हणजे निर्माण होणारी वाफेची पोकळी यंत्रणेला नकारात्मक इशारा देऊन भट्टी ची ऊर्जा कमी करू लागेल. 
 
    • आरबीएमके भट्टीमध्ये शीतक (पाणी) गायब असेल तर परिणामतः उष्णता वाढून उरलेल्या पाण्याची वाफ होईल मात्र नियंत्रक (ग्रॅफाइट) अजूनही उपस्थित असल्याने मंदावलेले  न्यूट्रॉन्स अणू भंजन करत राहतील ज्यामुळे उष्णता वाढतच राहील. परिणामी आणखी वाफ तयार होऊन प्रवाही पाण्याचा शोषक गुणधर्म कमी होईल. हा  शास्त्रीय भाषेत 'पॉझिटिव्ह व्हॉइड कोएफिशियंट' होय. म्हणजे निर्माण होणाऱ्या वाफेच्या पोकळीने यंत्रणेला अप्रत्यक्षपणे सकारात्मक इशारा दिला जाऊन ऊर्जा वाढवायला प्रोत्साहन मिळते. यामध्ये अभिक्रिया नियंत्रणात आणण्याची जबाबदारी फक्त बोरॉन गजांवरच असते.  ते वेगाने न्यूट्रॉन्स शोषून वाढीव ऊर्जेच्या अभिक्रियेत आडकाठी आणू शकतात. पण तेच जागेवर नसले तर?

मानवी चुकांची मालिका:

धोक्याची घंटा अडीच वर्षांपूर्वीच इग्नालीनाच्या आरबीएमके अणुभट्टीमधे वाजली होती. १९८३ मध्ये या अणुभट्टीत बोरॉन गज आत सारताना अचानक पावर सर्ज म्हणजेच ऊर्जेत लाक्षणिक वाढ दिसली होती. अगदी १९८२ मध्ये चेर्नोबील अणुभट्टी क्रमांक १ मध्ये इंधन गज वितळून किरणोत्सार होऊ लागला होता. पण या अपघातांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. 

चौथ्या अणुभट्टीला अपघात हा सुरक्षा चाचणीवेळी झाला. हि अणुभट्टी त्याच्या पूर्ण औष्णिक क्षमतेने ३२०० मेगावॅट वर अव्याहत सुरु होती. पण ठराविक कालावधीने भट्टी बंद करून केल्या जाणाऱ्या डागडुजीची वेळ आली आणि हि संधी साधून सुरक्षा चाचणी घ्यायचे ठरले. पाण्याच्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद झाल्यास  डिझेलवरील राखीव जनित्रे सुरु होईपर्यंत जो  ७० ते ८० सेकंद वेळ दवडला जात होता त्या वेळात शीतकाचा पुरवठा थांबू नये म्हणून मग त्या भट्टीच्या जनित्रातून निर्माण होणारी वीजच थोडा वेळ वापरायची अशी एकूण आयडिया होती. वर्षभरापूर्वी हि चाचणी अयशस्वी झाली होती कारण विजेचा दबाव सुयोग्य राहिला नव्हता. त्याची तजवीज करून आता चाचणी घ्यायचे ठरले. दिवसपाळीचे कर्मचारी या कामात माहितगार होते. त्यानुसार २५ एप्रिलच्या रात्री १ वाजल्यापासून रिऍक्टरची ऊर्जा कमी करायला सुरुवात झाली. २५ तारखेचा दिवस उजाडल्यावर दिवसपाळीचे कर्मचारी कामावर रुजू झाले. ३२०० मेगावॅट वर चालणारी भट्टी दुपारपर्यंत १६०० मेगावॅट म्हणजेच ५०% क्षमतेवर आलेली होती. चाचणी घेण्यासाठी ती २२% क्षमतेवर (७०० मेगावॅट) आणावी लागणार होती. पण दुपारी २ च्या सुमारास स्थानिक विद्युत पारेषण यंत्रणेकडून विजेच्या वाढीव पुरवठ्याची मागणी आली. महिन्याचा कोटा पूर्ण करणे आणि संध्याकाळची जास्तीची विजेची मागणी या कारणांमुळे क्षमतेत आणखी  घट  करणे थांबवून १६०० मेगावॅटला भट्टी  (५०%) स्थिर केली गेली. हि पहिली चूक घडली!

युरेनियम अणू विभाजन प्रक्रियेमध्ये आयोडीन १३५ हे किरणोत्सारी मूलद्रव्य तयार होत असते. या मूलद्रव्याचा अर्धायुकाल (हाफ लाईफ) ६.५ तासांचा असून तो किरणोत्सारी विघटनाने झेनॉन-१३५ या किरणोत्सारी मूलद्रव्याची ची निर्मिती करते. झेनॉन-१३५ हा अतिशय उत्तम न्यूट्रॉन शोषक आहे. पूर्ण ताकदीने चालणाऱ्या भट्टीत झेनॉन हा न्यूट्रॉन्स शोषून स्थिर आयसोटोप (झेनॉन-१३६) मध्ये रूपांतरित होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर झेनॉन-१३५ नष्ट होतो. पण २५ तारखेला भट्टी दुपारी २ पासून ते रात्री ११ पर्यंत ५०% क्षमतेने चालत होती. अशा वेळी त्यामध्ये निर्माण होणारा झेनॉन मात्र ६.५ तासांपूर्वी पूर्ण १००% क्षमतेने निर्माण झालेल्या आयोडीन पासून तयार होत होता. हा जास्त प्रमाणात तयार होणारा झेनॉन नष्ट करायला न्यूट्रॉन्सची निर्मिती फक्त ५०% क्षमतेवर होती. परिणामतः. झेनॉन साठू लागला! हा उत्तम शोषक असल्याने न्यूट्रॉन्सच्या संख्येत प्रचंड घट करू शकतो. कमी न्यूट्रॉन्स म्हणजे आणखी जास्त जमा होत रहाणारा झेनॉन-१३५!! अशा 'झेनॉन गर्तात' अडकलेल्या अणुभट्टीची क्षमता लगेच वाढवणे अशक्य आणि धोकादायक असते. त्यासाठी हा वायू नष्ट होण्याची वाट पाहून पुनःश्च हरिओम करावा लागतो. यामध्ये ७० तासाहून अधिक वेळ मोडू शकतो. पण चेर्नोबील मध्ये तर चाचणीला मूळातच विलंब झाला होता. स्थानिक पारेषण यंत्रणेने रात्री ११ च्या सुमारास पुढील रिऍक्टर शटडाऊन ला परवानगी दिली. आता १६०० मेगावॅट वर चालणारी भट्टी चाचणीसाठी ७०० वर आणायची होती. आता रात्रपाळीचे कर्मचारी येण्याची वेळ झाली होती. हे कर्मचारी चाचणीच्या कार्यप्रणालीबाबत नवखे  होते. इथे दुसरी चूक घडली!

२५ एप्रिल रात्रौ ११:००:

अननुभवी  कर्मचारी वर्गाला हाताशी धरून मुख्य अभियंते डिएटलॉव्ह यांनी योजना पुढे रेटायचे ठरवले.  कारण अणुभट्टी पूर्ण बंद करण्याचा योग पुन्हा लगेच येणार नव्हता. म्हणजे काही महिन्यांसाठीतरी योजना पुढे गेली असती. त्यांनी अणुभट्टीची औष्णिक क्षमता घटवण्याची सूचना दिली. १६०० वरून १००० ते ७०० च्या आसपास आणणे अपेक्षित होते. सगळे बोरॉनचे गज आत ढकललेले होते. पाण्याचे पंप पूर्ण क्षमतेने चालू होते. पण मॉनिटर वरचे आकडे झपाझप ७०० च्या खाली जाऊ लागले. काय गडबड होतेय समजत नव्हते. प्रत्यक्षात भट्टीच्या गाभ्यात मुबलक प्रमाणात झेनॉन जमा झाल्यामुळे मोठ्या संख्येने न्यूट्रॉन्स शोषले जाऊन भट्टीत रासायनिक अभिक्रिया थंडावत चालली होती. मग न्यूट्रॉन्स ची संख्या तातडीने वाढवण्याच्या नादात घाईघाईने बोरॉनचे गज बाहेर खेचण्यास सुरुवात झाली. त्यासाठी असलेली स्वयंचलित यंत्रणा बंद करून नियंत्रण कक्षातील कर्मचारी त्यावर देखरेख करू लागले.  झेनॉन बाधित भट्टीची ताकद फार हळू हळू वाढवणे आवश्यक असते. पण डिएटलॉव्हच्या हुकुमावरून सर्व सुरक्षा नियम एक एक करून नकळत  धाब्यावर बसवले जात होते. 

 २६ एप्रिल रात्रौ ००:३०:

सुरक्षा नियमानुसार जिथे २०० पैकी कमीत कमी १५ बोरॉन गज भट्टीच्या आत राहणे अनिवार्य होते, तिथे जेमतेम ८ गज आत  उरले होते. त्यातही एकच गज पूर्ण लांबीने आत होता अन बाकीचे गज अर्धवट आत बाहेर अवस्थेत होते!!!. ऊर्जा स्तर वेगाने वाढवण्यासाठी हा आटापीटा होता. भट्टीची ताकद ३० मेगावॅटवर (फक्त १%) होती. एवढ्या कमी उर्जेवर पाणी उकळून वाफ होणे अशक्य होते. आता अगदी मुंगीच्या पावलांनी ऊर्जेत वाढ होऊ लागली. भट्टीमधील गजांची स्थिती आणि त्यानुसार गाभ्यातील विविध अंतर्गत परिमाणे दर्शवणारी संगणक प्रणाली मुख्य नियंत्रण कक्षापासून थोडी लांब होती. ती तब्बल १५ मिनिटांनी भट्टीच्या आतील स्थितीचा लेखाजोखा प्रिंट करत असे!

 २६ एप्रिल रात्रौ ०१:००:

आता उष्णता  कशीबशी २०० मेगावॅट ला येऊन पोहोचली. चाचणीसाठी हा आकडा पुरेसा नव्हताच. पण  तो गाठेपर्यंतसुद्धा घाम फुटला होता. अजून ७०० मेगावॅट पर्यंत उष्णता वाढवून त्यांनतर चाचणी सुरु करणे डिएटलॉव्ह यांना प्रचंड वेळखाऊ वाटू लागले. पुन्हा एकदा अयोग्य निर्णय घेतला गेला. ताबडतोब चाचणी सुरु करायचे ठरवले गेले!!!

 २६ एप्रिल रात्रौ ०१:२० :

पाण्याच्या पंपांचा विद्युत पुरवठा बंद केला गेला. आता थांबत आलेल्या जनित्रांच्या वीजेवर पम्प चालून पाणी पुरवठा दीड एक मिनिटे सुरळीत चालू राहतो का हि तपासणी करायची होती. शीतक नसल्यामुळे गाभ्याच्या तापमानातील थोडी वाढ गृहीत धरलेली  होती. पण क्षणार्धात उष्णता  ५०० मेगावॅटवर पोचली. त्यात झपाट्याने वाढ होत चालली. एवढी ऊर्जावाढ अपेक्षित नव्हती! कक्षात भीतीची लहर पसरली. लगोलग एझेड-५ सुरक्षा  कळ दाबली गेली. हि कळ म्हणजे अणुभट्टीतील अभिक्रिया धोकादायकरीत्या हाताबाहेर जात असताना अंतिम उपाय किंवा सुटकेचा मार्ग म्हणून कामी येते. ए झेड-५ सर्व बोरॉनचे गज एकाच वेळी आत ढकलायची आज्ञा देते. २००+ गज आत गेल्यावर न्यूट्रॉन्स झपाट्याने शोषले जाऊन अभिक्रिया क्षणार्धात मंदावणे अपेक्षित असते. पण इथे मात्र हि कळ गवताच्या गंजीत फेकलेली पेटती काडी ठरली.  पुढच्या काही सेकंदातच झालेल्या स्फोटाने २००० टन वजनाचे भट्टीचे झाकण हवेत उडवले. मागोमाग झालेल्या त्यापेक्षा मोठ्या स्फोटाने नियंत्रण कक्ष हादरले. ग्रॅफाईटचा गाभा ठिकऱ्या होऊन फुटला होता. भट्टीमधील किरणोत्सारी इंधन खूप मोठ्या प्रमाणात हवेत उधळले जात होते. उघडी पडलेली अणुभट्टी आगीचे लोळ आणि  धूर ओकत होती. 

एझेड-५ कळ हि रक्षक न ठरता भक्षक का ठरली?

 

चित्रात दाखवलेला सहा कळीचा संच ए झेड-५ संबोधला जातो. (स्रोत:Pinterest)

आरबीएमकेच्या गाभ्याच्या संरचनेत असलेली त्रुटी या विनाशाला कारणीभूत होती. अभिक्रिया वाढवण्यासाठी  जेव्हा बोरॉनचे गज बाहेर खेचले जातात तेव्हा मागे राहणारे रिकामे नळकांडे पाण्याने भरून ते पाणी पुन्हा न्यूट्रॉन्स  शोषकाचे काम करु शकते. ते अभिक्रियेला मारक ठरू नये म्हणून बोरॉन गजांच्या पुढे त्याच रुंदीच्या  ग्रॅफाईटच्या कांबी जोडलेल्या होत्या. म्हणजेच बोरॉनचे गज भट्टीच्या बाहेर येताना त्याच्या खालच्या टोकाला लावलेल्या ग्रॅफाइटच्या काम्बी त्याची जागा घेतील. त्या आजूबाजूच्या विटांप्रमाणे नियंत्रकाचे कार्य करतील आणि अभिक्रिया वाढू लागेल. पण या कांबी (४.५ मी.) बोरॉन गजांइतक्या लांब मात्र नव्हत्या. त्यामुळे भट्टीच्या तळाकडील आणि वरच्या भागातील नळकांड्याची १.२५ मीटरची जागा रिकामी रहात होती आणि ती पाण्याने भरत होती. सोबत दिलेल्या चित्रावरून तुम्हाला कल्पना येईल.  ('ब' स्थिती)

 

 
 
 
ऊर्जा वाढवण्याच्या नादात जेव्हा सर्व बोरॉन बाहेर खेचले गेले तेव्हा त्याची जागा ग्रॅफाइट कांड्यांनी घेतली. पण तरीही त्यांच्या तळाकडील मोकळ्या उरलेल्या नळकांड्यात पाणी भरले होते. ग्रॅफाइट ऊर्जा वाढवायला मदत करत होते पण  हे पाण्याचे  स्तंभ त्यावर थोड्या प्रमाणात अंकुश आणत होते. गाभ्यात जमा झेनॉन त्याला मदत करत होता. आता टप्प्या टप्प्याने गाभ्यातील अंतर्गत घडामोडी नजरेसमोर आणू:
  1. पाण्याचे पम्प बंद केल्यावर शीतक नाहीसे झाल्याने उष्णता वाढू लागली. 
  2. इंधन नळकांड्यांभोवती पाणी उकळून त्याची अधिकाधिक वाफ बनली. 
  3. मागे सांगितल्याप्रमाणे पाणी कमी वाफ (व्हॉइड -पोकळी) जास्त  अशा अवस्थेत पाण्याची शोषक क्षमता कमी झाली. बोरॉन शोषक तर बाहेर काढले होतेच. 
  4. परिणामी  न्यूट्रॉन्स संख्येने वाढले. ग्रॅफाईटने अभिक्रिया वाढवली. 
  5. उष्णतेत भर पडत गेली. म्हणजेच पॉझिटिव्ह व्हॉईड कोइफिशियंट!!! हे दुष्टचक्र होते. अधिक उष्णता म्हणजे अधिक वाफ म्हणजे आणखी सकारात्मकतेकडे झुकणारा पोकळी गुणांक! 
  6. या वणव्याला आवर घालू शकणारे बोरॉनचे गज जागेवर नव्हतेच. झेनॉन सुद्धा झपाट्याने नष्ट होऊ लागला. 

परिणामतः १:०५ वाजता २०० मेगावॅट वर असणाऱ्या भट्टीने  चटकन १:२० च्या सुमारास ५०० चा आकडा गाठला नि तो पुढे असाच वाढू लागला.  घाबरलेल्या कर्मचाऱ्यांना  ए झेड-५ कळीची शाश्वती होती. ती दाबल्यावर सगळे २००+ बोरॉन रॉड्स एकाचवेळी आत जाऊन भट्टी थंड पडायला हवी होती.  गज आत जाण्याचा वेग होता ४० से.मी./ सेकंद. ७ मीटर खोल भट्टीमध्ये गज पूर्णपणे आत सरकायला १८ सेकंद वेळ लागत होता. त्यातल्या पहिल्या २-३ सेकंदातच बोरॉनचा  गज त्याच्या पुढे जोडलेल्या ग्रॅफाईटला ढकलू लागल्यावर सर्व २०० नळकांड्यांमधला तळाकडील पाण्याचा स्तंभ नाहीसा झाला (चित्रातील 'क' स्थिती).  या काही सेकंदांच्या अवधीत शेवटचा शोषकही गायब झाल्याने (अजून बोरॉन गाभ्यात नीट शिरलेला नाही) ऊर्जेने  अचानक प्रचंड उसळी घेतली. गाभ्याच्या तळाला तयार झालेल्या या प्रखर उष्णतेने झिर्कोनियम मिश्रधातूची  बनलेली इंधन नळकांडी  वितळली  आणि त्याभोवतीच्या सगळ्या पाण्याची क्षणार्धात वाफ झाली. एवढ्या प्रचंड वाफेच्या दबावाने २००० टन वजनाचे छत आणि त्यात बसवलेले बोरॉनचे गज उखडून हवेत भिरकावले. त्याबरोबर बाहेरील हवेशी अत्यंत तप्त इंधनाचा संपर्क होऊन दुसरा भीषण स्फोट झाला. ग्रॅफाईटचा गाभा फुटून सर्वत्र उडाला. इंधनाचे प्लाझमा  अवस्थेत रूपांतर होऊन ते हवेत फेकले गेले. गाभ्याच्या अंतर्गत ऊर्जेची आकडेवारी दाखवणारी यंत्रणा अंतिम नोंद  ३३ गिगावॅट (भट्टीच्या मर्यादेच्या दसपट) दाखवत होती

एवढ्या मोठ्या स्फोटांनी प्रिप्यात वासीयांची झोप उडवली. सर्वजण जिथून जमेल तिथून अणूऊर्जा केंद्रातून निघणाऱ्या आगीच्या लोळांकडे नजर लावून होते. थोड्याच वेळात तिकडे हजारो किमी लांब स्वीडन मध्ये हवेत वाढलेला किरणोत्सार यंत्रांवर दिसत होता. इकडे कित्येक पटीने जास्त किरणोत्साराच्या वर्षावात प्रिप्यात उभे होते.



 

उघड्या गाभ्याचा वरून घेतलेला फोटो (स्रोत: wikimedia commons)

सदर दुर्घटना अणू ऊर्जेच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिली गेली. पण त्यामुळे अणू ऊर्जा वाईट असा गैरसमज करून घेणे अयोग्य होईल. माणसाची ऊर्जेची भूक प्रचंड आहे. युरेनियमच्या एका खोडरबराच्या आकाराच्या वडीमध्ये ट्रकभर दगडी कोळशाची उष्णता सामावलेली आहे.

कोळसा, तेल आदी खनिज स्रोतांपासून ऊर्जा मिळवताना होणारे प्रदूषण, मर्यादित साठे ह्या समस्या वेगळ्या सांगायला नकोच. त्यामुळे त्याला स्वच्छ पर्याय म्हणजे अपारंपरिक स्रोत आणि अणू ऊर्जा होय. आपली अफाट वाढती मागणी बघता अणू ऊर्जा सगळ्यांना पुरून उरणारी ठरते. चेर्नोबिलचा अपघात मानवी गलथानपणा आणि ढिसाळ नियोजनाचे प्रतीक आहे.  १९८६ मधील या घटनेनंतर अणुभट्ट्यांचे तंत्रज्ञान, संरचना, सुरक्षा निकष खूप प्रगत झालेले आहेत. २०११ मध्ये फुकुशिमा येथील प्रकल्पाला झालेला अपघात हा भूकंप आणि त्सुनामी या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होता. पण त्यामुळे हे तंत्रज्ञान अधिकाधिक सुरक्षित बनवण्यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत. भविष्यातील आपली जागतिक ऊर्जेची मागणी पाहता अणू ऊर्जा हा स्रोत सर्वात अग्रेसर राहील यात शंका नाही. अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि सुरक्षा उपायांची अमलबजावणी केल्यास हा अखंड ऊर्जेचा झरा वर्षानुवर्षे वाहता राहू शकतो.


 आपला मित्र,

विक्रांत घाणेकर

खालील लिंक वापरून आपण सदर लेखाचा पूर्वार्ध वाचू शकता.

https://tumcheaamchevidnyan.blogspot.com/2020/11/chernobyldisasterpart1.html


संदर्भ :

https://www.world-nuclear.org

 http://www.chernobylgallery.com

https://en.wikipedia.org/wiki/Chernobyl_disaster

https://www.youtube.com/watch?v=q3d3rzFTrLg

 https://www.youtube.com/watch?v=uvpS2lUHZD8

https://www.youtube.com/watch?v=bCbms6umE_o&t=795s

https://www.youtube.com/watch?v=NeZScDZA_uY&t=453s

https://www.youtube.com/watch?v=pOzJQJ1yAaM

https://www.youtube.com/watch?v=fwtNvnWZjZY 

https://www.youtube.com/watch?v=YRPuO1RhbKo&t=414s

https://www.youtube.com/watch?v=hIGtTImeYU4&t=665s

 

 

 

Comments

Popular posts from this blog

टोळ धाड: एक आश्चर्यकारक जागतिक समस्या

२६ एप्रिलची काळरात्र (भाग १)

लसीकरणाचे स्पष्टीकरण (उत्तरार्ध)