टोळ धाड: एक आश्चर्यकारक जागतिक समस्या



लहानपणी मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट सगळ्यांनीच  ऐकली असेल. मुंगी उन्हाळ्याच्या दिवसात सतत काम करून आपल्या अन्नाची बेगमी करून ठेवते तर नाकतोडा तिची खिल्ली उडवत गाणी गात राहतो आणि काही काम न करता पायावर पाय टाकून आराम करतो. असा हा आळशी आणि मंदगती नाकतोडा अचानक चर्चेत आला तो हल्ली पश्चिम मध्य भारतात आलेल्या टोळधाडीमुळे. करोडोंच्या संख्येने टोळांचा थवा जेव्हा मार्गक्रमण करू लागतो तेव्हा वाटेत येणाऱ्या प्रत्येक शेतीमालाचा फन्ना उडवत जातो.  आपल्याकडे हा विध्वंस सवयीचा नसला तरी काही देशांमध्ये याचा प्रकोप भयानक म्हणावा इतका आहे. एरव्ही शांत आणि थंड असणारा हा एकाकी  प्राणी झुंडीमध्ये  पिसाळल्यासारखा कसा वागू लागतो  याची उत्सुकता वाटून माहिती शोधायला सुरुवात केली आणि काही आश्चर्यजनक तथ्ये समोर आली. या लेखाद्वारे आपल्या सर्वांपर्यंत हि रंजक माहिती पोहोचावी म्हणून हा प्रयत्न.

टोळ हा नाकतोड्याचाच भाऊबंद. दोघेही ' ऑर्थोप्टेरा ' (orthoptera ) या एकाच कुटुंबातील अपृष्ठवंशीय कीटक.  हा पूर्णपणे शाकाहारी असून त्याला इतर कीटकांप्रमाणेच  पायाच्या तीन जोड्या असतात. अंगावर कडक बाह्य आवरण असून तोंडाचे भाग (जबडे) कठीण चिवट अन्नाचा तुकडा मोडण्यासाठी विकसित झालेले असतात.  खालील चित्रामध्ये जो मॅंडिबल हा भाग दाखवलाय त्याला काळी दातेरी किनार आहे ती कैची अथवा अडकित्त्या प्रमाणे काम करते.

सर्व साधारणतः हा लाजरा बुजरा प्राणी एकाकी जीवन व्यतीत करणारा आहे.  कीटक जगतात नेहमी वाढ हि अंडी, अळ्या, कोष आणि प्रौढ कीटक अशा  टप्प्यातून जाते. अळी  स्वरूपात असताना सतत ठराविक काळाने कात टाकली जाते आणि अळी आकाराने वाढत जाते. शेवटच्या टप्प्यात अळी कोषावस्थेत जाते आणि विशिष्ट कालावधीत कोषातून प्रौढ कीटक बाहेर येतो. टोळासारख्या काही कीटकांमध्ये अळी  आढळत नाही. अंड्यातून दोन आठवड्याच्या कालावधीत पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर येणारे अर्भक आणि पूर्ण वाढ झालेला टोळ  यांच्यामध्ये मुख्य फरक हा असतो कि बाल्यावस्थेत पंखांचा अभाव असून शरीर आकाराने लहान असते. परंतु वाढीदरम्यान  विशिष्ट  काळाने  जेव्हा  बाह्य  आवरणात शरीर मावेनासे होते तेव्हा कात टाकून पिल्ले पुढच्या वाढीच्या स्तरावर जातात. असे चार ते पाच स्तर महिना दीड महिन्यात पार केल्यावर प्रौढावस्था प्राप्त होते. आपण अशी कल्पना करू कि लहान मुलाला पहिलीतून दुसरीत जाताना त्याला आधीचा गणवेश लहान  होत असल्याने सोडून द्यावा लागतो आणि  नवा युनिफॉर्म घ्यावा लागतो. असे पाचवीपर्यंत कपडे बदलल्यावर पूर्ण वाढ झालेला कीटक अस्तित्वात येतो. ह्याचा जीवनकाल ३ ते पाच महिन्यांचा असतो. हा प्राणी प्रजननाची एक गरज वगळता बाल्यावस्थेत किंवा प्रौढावस्थेत सतत एकटाच (solitary) राहणे पसंत करतो परंतु नैसर्गिक बदलांमुळे जेव्हा नकळत त्यांना  एकत्र येणे भाग पडते तिथे खरा गोंधळ सुरु होतो.




टोळांचे सामूहिक जीवन:

हा एकलकोंडा जीव उन्हाळ्यामध्ये जेव्हा खाण्यायोग्य वनस्पती वाळल्यामुळे अन्न  शोधू लागतो तेव्हा जिथे पुरेसा स्रोत  मिळेल त्या त्या जागा हुडकून काढतो. अशा मोजक्या ठिकाणी हळू हळू या कीटकांची गर्दी होऊ लागते. ह्या गर्दीतून एकमेकांचा शारीरिक सम्पर्क वाढीस लागतो आणि हा सम्पर्क त्यांच्या वागणुकीत आमूलाग्र बदल घडवून आणतो. कारण यामुळे एकाकी (solitary) जीवनशैलीतून सामूहिक (gregarious) जीवनशैलीत हा कीटक रूपांतरित होतो. हे म्हणजे 'भेटलोच आहोत तर आता राहूया एकत्र' किंवा 'एक से भले चार' असे साधे सोपे नसते. टोळांचे  सम्पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून जाते. सामूहिक जीवनात या कीटकाच्या शरीरात अनेक रासायनिक बदल होतात, बाह्य स्वरूपातही दृश्य बदल दिसून येतात. वागणुकीत कमालीचा फरक पडतो.  आता हा प्राणी स्वभावातील शांत आणि संथपणा गमावून आक्रमक बनतो. त्याच्या खाण्याचा वेग आणि प्रमाण वाढते. त्याच्या शरीराचा रंग बदलतो. एकट्या (solitary )राहणाऱ्या टोळाचा रंग हिरव्याकडे झुकणारा असतो आणि त्यावर क्वचित लहान काळे ठिपके असू शकतात. तर सामूहिक (gregarious) जीवनपद्धतीत त्याचा रंग लाल पिवळसर असून त्याच्या अंगावर मोठे काळे ठिपके आढळतात. आश्चर्याची बाब हि कि त्यांच्या मेंदूच्या आकारातही वाढ होते. गटामध्ये राहणाऱ्या टोळांचा आकारही मोठा असतो. त्यांची मागील पायाची जोडी एकट्या  राहणाऱ्या भाऊबंदांपेक्षा थोडी आखूड असते. हे बदल फक्त प्रौढ कीटकांतच  दिसतात असे नसून हे व्यक्तिमत्व रूपांतरण (transformation) वाढीच्या कुठल्याही टप्प्यावर  होते. अगदी १९२१ पर्यंत या एकाच कीटकाच्या दोन अवस्था आहेत याचा पत्ता नव्हता. उलट या दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत अशीच समजूत होती, इतकी शारीरिक आणि वर्तनातील भिन्नता जाणवणारी होती. अशा सामूहिक जीवन जगणाऱ्या टोळांची अंडी सुद्धा एकत्र घातली जातात. एक मादी १०० ते १५० अंडी घालते आणि त्यातून येणारी पिल्ले एकाकी स्वरूप न स्विकारता एकत्रित जीवनच  अंगिकारतात. एखादी साथ पसरावी तसे संपर्कातील सर्व टोळ स्वतःला सामूहिक (gregarious) जीवनशैलीत रूपांतरित करू लागल्याने हा गट लहानसहान न राहता आकाराने खूप मोठा होत जातो. आता हि झुंड लाखो टोळांनीं बनलेली असते. यातील सर्वांची भूक वाढलेली असते. अशा जथ्थ्यामधील टोळ दर दिवसाला आपल्या वजनाएवढे अन्न फस्त करू शकतो. एका झुंडीमध्ये अगदी ४ ते ८ करोड कीटक सुद्धा असू शकतात. आता फक्त  कल्पना करा कि एवढे भुकेने वखवखलेले सैन्य किती एकर जमीन व्यापू शकते आणि वाटेत येईल त्या सर्व अन्न धान्य, भाजीपाला, फळ बागा यांचा कसा फन्ना उडू शकतो ते!!!



 प्रौढ अवस्थेत पोहोचेपर्यंत हा प्राणी पंख नसल्याने फक्त चालू किंवा मागच्या लांबलचक पायांनी उड्या  मारू शकतो. मात्र पूर्ण वाढ झालेल्या टोळांचे  पंख फुटलेले असल्याने ते उडू शकतात आणि झुंडीच्या अवस्थेत तर ते खूप दूरचे अंतर पार करू शकतात. १९८८ च्या एका टोळधाडीत पश्चिम आफ्रिकेतून कॅरिबियन बेटांपर्यंतचे ३१०० मैलांचे (जवळ जवळ ५००० किमी.) अंतर फक्त १० दिवसात पार केलेले दिसून आले. आफ्रिकन देशांमधील शेतीला या आक्रमणाचा खूप मोठा फटका बसतो. एरवी  जवळपासच्या  ३० देशांमध्ये कायम आढळणाऱ्या या कीटकांच्या काही प्रजाती झुंडीच्या स्वरूपात ६० देशांपर्यंत मजल मारतात. आफ्रिकेमध्ये आलेल्या या वेळच्या टोळधाडीने केनियाच्या सम्पूर्ण लोकसंख्येला दोन दिवस जेवढे अन्न पुरेल तितके अन्न एका दिवसात सम्पवले आहे. चार करोडच्या जवळपास संख्या असलेला जथ्था दिवसाला १,८०,००० टन इतका शेतीमाल गट्ट करू शकतो. एवढ्या वजनाचा मका ८,००,००० माणसांना वर्षभर पुरु शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पॅरिस शहराच्या आकाराची झुंड एका दिवसात संपूर्ण फ्रांस देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला पुरेल एवढे धान्य फस्त करते!! यावर्षी भारतातील पश्चिम आणि मध्य भागातील राज्यांना टोळधाडीचा फटका बसला आहे. १९९३ नंतर तब्बल २७ वर्षांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हि आपत्ती ओढवली आहे. उष्ण दमट हवामान, अन्नाची कमतरता, पावसाने आलेला ओलावा, वादळी हवामान असे घटक या कीटकांच्या एकत्रित येण्याला कारणीभूत ठरतात. अशा वातावरणात प्रजनन आणि वाढ जोमाने होऊन थवा निर्माण होण्याची प्रक्रिया जलदगतीने होते.

जगभरात टोळधाड शेतीमालाच्या प्रचंड नुकसानीला कारणीभूत ठरत असल्याने संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी  प्रतिष्ठानाने यावर सतत लक्ष ठेवलेले असते. सर्व देश आपापल्या क्षेत्रातील टोळधाडींबद्दल माहिती या संस्थेला पुरवतात. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने झुंडीचे उगमस्थान, व्याप्ती, दिशा  किंवा प्रवासाचा वेग अशी सर्व माहिती हि संस्था जमा करून पुढील धोक्याची  आगाऊ सूचना देऊ शकते. त्यामुळे थवा पोहोचण्याच्या आधी कीटकनाशकांची फवारणी करून नुकसानाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. तरीही झुंडीचा एकूण पसारा खूप मोठा असल्याने होणारा विध्वंस पूर्ण टाळणे अशक्यच आहे. या सर्वांचे मूळ म्हणजे टोळांचे सामूहिक अवस्थेतील रूपांतर. कारण या स्वरूपात त्यांचे व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून खादाड राक्षसाचा अवतार निर्माण होतो. त्यामुळे हे रूपांतरण टाळण्यावर संशोधनाचे लक्ष केंद्रित झाले आहे. एका अभ्यासात असे दिसून आले कि टोळांच्या मागच्या पायांवर बाहेरच्या बाजूला संवेदनशील केस असतात. हे केस एकाकी राहणाऱ्या टोळांमधे ५०% अधिक संख्येने आढळून आले आहेत. या  कीटकांना  जेव्हा अन्नासाठी एकत्र यावे लागते तेव्हा गर्दीमध्ये एकमेकांचे पाय आणि पर्यायाने हे केस घासले जाऊन स्पर्शाद्वारे शरीरांतर्गत संदेशवहन प्रक्रिया (सिग्नल जनरेशन) कार्यरत होते. हे सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात संशोधकांनी एकाकी टोळांवर प्रयोग केले, ज्यामध्ये कीटकाच्या विशिष्ट अवयवाला वारंवार ठराविक वेळेच्या अंतराने ब्रशच्या मदतीने स्पर्श करत राहिले. असे वेगवेगळ्या अवयवांबाबतीत केल्यावर त्यांना जाणवले कि टोळांचे सर्वात मागील पाय तेथील केसांमुळे जास्त संवेदनशील असतात आणि त्याला स्पर्श होत राहिल्यास 'सामूहिक अवस्थेत रूपांतर' जलद गतीने होते. समूहात वावरणाऱ्या टोळांमध्ये मात्र पायावरील केसांची घनता कमी आढळून आली.

शास्त्रज्ञांच्या एका गटाचा  सेरोटोनिन (चेतासंस्थेच्या संदेश वहनात कामी येणारे एक रसायन) या चेतापारेषकाचा (न्यूरोट्रान्समीटरचा) या बदलामध्ये मोठा सहभाग आहे असा दावा आहे. सेरोटोनिन आपल्या मानवी शरीरात आनंदाची भावना निर्माण करण्यात प्रमुख भूमिका बजावते. याशिवाय राग, भूक, निद्रा, कामेच्छा अशा अनेक भावना या रसायनाच्या शरीरातील प्रमाणावर अवलंबून असतात. ज्या एकाकी टोळांच्या मागील पायाला स्पर्श केला होता त्यांच्या शरीरात सेरोटोनिन चे प्रमाण तिप्पट झालेले होते. म्हणजेच केसांच्या घासण्याने शरीरातील हे चेतापारेषक (न्यूरोट्रान्समीटर) कार्यरत होऊन पुढील शारीरिक आणि मानसिक बदलांमधे महत्वाची भूमिका बजावते असे दिसते.ज्या एकाकी टोळांमध्ये सेरोटोनिन ची निर्मिती कृत्रिमरीत्या थांबवली गेली अथवा विशिष्ट रसायनांनी सेरोटोनिन ला निष्प्रभ केले गेले ते टोळ नंतर सामूहिक जीवनशैलीत रुपांतरीत होऊ शकले नाहीत. दुसऱ्या एका अभ्यासात असेही निष्कर्ष समोर आले आहेत कि सामूहिक जीवन जगणाऱ्या टोळाच्या पिल्लांना एकांतात ठेवून जर सेरोटोनिन ची मात्रा दिली तर ते शांत होऊन एकांतवास स्वीकारतात!! म्हणजे या रसायनाची कार्यपद्धती  आश्चर्यकारक असून ती टोळाच्या व्यक्तिमत्त्वात नि राहणीमानात टोकाचे बदल घडवू शकते.





या सर्व संशोधनाचा रोख टोळांना एकत्र येण्यापासून रोखणे आणि त्यांचे स्थित्यन्तर थांबवणे हा आहे. पारंपरिक कीटकनाशकांची फवारणी या आकाशातून झेपावणाऱ्या संकटाला पूर्णपणे थोपवू शकत नाही. टोळा ला संसर्ग करू शकतील असे सूक्ष्मजीव, बुरशी यांचाही शोध घेतला जात आहे. टोळधाड संपूर्ण भरात असताना जागतिक अन्नसाठ्याच्या एक दशांश भाग नष्ट करू शकते  त्यामुळे हा एकांतप्रिय प्राणी सामाजिक न होणेच आपल्याला हितकारक आहे.


आपला मित्र,

विक्रांत घाणेकर


संदर्भ:

https://academic.oup.com/aesa/article-abstract/112/5/458/5529659?redirectedFrom=fulltext

https://www.nationalgeographic.com/animals/invertebrates/group/locusts/

https://entomologytoday.org/2019/09/04/swarm-shift-how-locusts-switch-phases-when-numbers-swell/

http://www.insectsexplained.com/03external.htm

https://bbsrc.ukri.org/documents/locust-feeding-pdf/

http://www.fao.org/food-chain-crisis/how-we-work/plant-protection/locusts/en/

      










  

Comments

Popular posts from this blog

२६ एप्रिलची काळरात्र (भाग १)

लसीकरणाचे स्पष्टीकरण (उत्तरार्ध)