लसीकरणाचे स्पष्टीकरण (पूर्वार्ध)


थोडासा इतिहास:


कोविड १९ च्या निमित्ताने विविध उपचार पद्धतींचा उहापोह चालू झाला आहे. माझ्या मागील ब्लॉगनंतर काही आप्तजणांनी ‘पोलिओ लस असते तशी याची नाही का? लसीकरण म्हणजे नक्की काय? लस म्हणजे औषधच ना?’ अशा प्रश्नाची सरबत्ती केली. या उत्सुकतेत भर म्हणजे नुकतेच बातम्यात सांगितले गेले कि जर्मनी, UK मध्ये संशोधित कोविड लसी ला मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. हि बातमी जरी थोड्याफार प्रमाणात सकारात्मक असली तरी अजून हि लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यास वर्षाचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. एवढा दीर्घ कालावधी का लागतो याचा खुलासा पुढे होईलच पण मुळात ‘लसीकरण’ हा विषय समजून घ्यायला अतिशय रंजक आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे एखाद्या विकसित देशाची सुसज्ज संरक्षण यंत्रणा आहे. खरतर एवढी सुसूत्रतेने बांधलेली, सुनियोजित, प्रचंड तत्पर सैन्यदले कुठल्याही देशाशी तुलना होऊच शकत नाही. हल्ला करणाऱ्या शत्रू नुसार आपली मोर्चेबांधणी इतक्या काटेकोर पणे केली जाते कि या यंत्रणेचे कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही. एवढी जटील संरक्षण व्यवस्था घेऊन आपण फिरत असतो याची कल्पना आपल्यालाच नाहीये. परंतु हि प्रचंड भक्कम फळी भेदूनही जेव्हा शत्रू जोर पकडू लागतो (आजारी पडणे) तेव्हा आपण औषधे घेऊन त्याला जेरीस आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या ला बाहेरून वेगळी कुमक पाठवावी लागते. दुसरीकडे लसीकरण पद्धतीत मात्र शत्रू सैन्य हल्ला करण्यापूर्वी आपल्या अंतर्गत सैन्यालाच एका ठराविक शत्रूसाठी विशेष प्रशिक्षण देऊन त्यातून कमांडो पथक तयार करण्याचा प्रकार आहे.


लस म्हटले कि पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे सर एडवर्ड जेन्नर यांचे. आपल्यापैकी बर्याच जणांना माहितच असेल कि देवी रोगावर लस शोधून काढण्याचे मौलिक काम जेन्नर यांनी केले आणि या शास्त्राचा पाया घातला गेला. सतराव्या शतकात देवीचा प्रादुर्भाव भयानक होता. युरोपात देवी पायी मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू असताना जेन्नर यांना लक्षात आले कि त्यांच्या गावातील गवळणी बऱ्याच अंशी या आजारातून बचावलेल्या आहेत. देवीच्या तडाख्यात सापडलेले एकतर बळी जात आहेत अथवा त्यातून वाचलेली मंडळी फोडांचे कायमस्वरूपी व्रण घेऊन फिरत आहेत अशा काळात या गवळणींची कांती नितळ आणि फार फार तर हातावर एक दोन फोड!! या विरोधाभासाने जेन्नर चक्रावले. त्यांनी पाहिले कि या स्त्रिया अशा गायींच्या संपर्कात होत्या ज्यांना जनावरांतील देवीसदृश्य आजार होता ज्यामुळे त्या गायींच्या आचळांवर तसेच फोड होते. जेन्नर यांना लक्षात आले कि या फोडांमधील द्रवात काहीतरी औषधी तत्व आहे ज्याचा अप्रत्यक्ष फायदा या महिलांना मिळत आहे. यानंतर त्यांनी केलेला प्रयोग सर्वश्रुत आहेच. गायीला लॅटिन भाषेत Vacca असा शब्द असल्याने vaccination हि संज्ञा रूढ झाली. लसीकरणाचे मूळ हजाराव्या शतकात चीन व भारतीय उपखंडात सापडते. त्यावेळी अशा आजारी व्यक्तीच्या सुकलेल्या फोडातील भुकटी जमा करून ती निरोगी माणसाला तपकिरी प्रमाणे हुंगायला दिली जात असे अथवा लहानशी जखम करून त्यात भरली जात असे. जेन्नर यांनी लसीकरणाला सुरुवात केली असली तरी त्याला वैज्ञानिक जगात मान्यता मिळेपर्यंत अठरावे शतकाची अखेर आली. या काळात लुई पाश्चर यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या नवीन शाखेचा पाया घातला होता. जिवाणू आजाराला कारणीभूत ठरतात हे सिद्ध झाले होते. जेन्नर यांच्या योगदानाला पुष्टी मिळाली होती.


आपण आजारी कसे पडतो?

आपण आपल्या आतमध्ये एक बलाढ्य संरक्षक फौज घेऊन वावरत असतो. एखादा रोगकारक जन्तु जेव्हा येनकेन प्रकारे शरीरात प्रवेशतो तेव्हा त्याचे वाढ आणि प्रजनन हे मुख्य उद्देश असतात. बरेचदा आपल्या श्वसन संस्थेच्या, पचनसंस्थेच्या पेशींवर मुख्यतः हल्ला होतो कारण येथे अन्न, हवा या बाह्य घटकांची सतत ये-जा सुरु असते . या जंतूंच्या वाढीसाठी आपल्या पेशींचे वातावरण पोषक ठरते. हि सूक्ष्म जीवांची वाढ पेशींना इजा पोचवू लागते. या जंतूंद्वारे सोडलेली विषारी द्रव्ये पेशींच्या कार्यात बाधा आणू लागतात. अशा वेळी आपली संरक्षण यंत्रणा या damage कंट्रोल ला जुंपते. या सर्वांची परिणीती म्हणजे ताप येणे, जखम असल्यास पु होणे, खोकला, उलट्या अशी विविध आजाराची लक्षणे होय. हि लक्षणे म्हणजे आपले सैन्य बाहेरील शत्रूशी लढत असल्याची खूण आहे. उदा. आपल्याला जो ताप येतो तो म्हणजे वाढीव तापमानाने जंतूंचा नायनाट करण्यासाठी शरीराने केलेला प्राथमिक प्रयत्न होय.एरव्ही ३७ अंशावर स्थिर राहणारे शरीर आपला अंतर्गत तापमाननियंत्रक जास्त अंकांवर सेट करते. हे तापमान इतके वाढू शकते कि ते अगदी आपल्या नाजूक पेशी आणि महत्वाच्या प्रक्रियांना क्षती पोचवू शकते. म्हणून आपल्याला तापावर तातडीने औषध घेणे गरजेचे असते.


आपले संरक्षण तंत्र:

आपल्या लेखाचा मुख्य उद्देश लसीकरणाची माहिती हा असल्याने आपण त्या संबंधित संरक्षण यंत्रणेच्या विभागावर जास्त लक्ष केंद्रित करूया. रक्तामध्ये मुख्यत्वे लाल रक्तपेशी आणि श्वेत पेशी यांचा समावेश होतो. श्वेत पेशी मजबूत संरक्षक यंत्रणा उभी करतात.आपल्या शरीरातील लढाऊ सैन्य (श्वेत रक्त पेशी) या रक्त आणि लिम्फ या दोन द्रव माध्यमातून सर्व शरीराच्या कानाकोपऱ्यात संचार करत असतात. त्यामुळे कुठल्याही इंद्रियाच्या संसर्गाची चाहूल लागून तिथे हि आपली फौज पोचायला वेळ लागत नाही. या फौजेमध्ये वेगवेगळ्या हुद्द्यावरचे अधिकारी आहेत. मायक्रोफाजेस, Natural killer cells, डेंड्रिटिक cells, neutrophils, lymphocyte अंतर्गत येणाऱ्या B आणि T cells असा मोठा आर्मी, नेव्ही, एअर फोर्स टाईप जंगी मामला असतो. हे सर्व रक्षक एकमेकांच्या सहाय्याने परकीय पदार्थांना नष्ट करण्याच्या विविध पद्धती अवलम्बतात. त्यातील एक पद्धत म्हणजे अँटीबॉडी ची निर्मिती.









बाहेरून शिरलेल्या जीव जंतूंच्या पृष्ठभागावर तसेच आंतररचनेमध्ये बरेच प्रथिनांचे, कर्बोदकांचे अथवा ग्लायकोप्रोटीन संयुगांचे जटिल रेणू आढळतात. या जीवांना आपल्याप्रमाणे अवयव अथवा इंद्रियांची किचकट रचना नसल्याने केवळ हे वैशिष्ट्यपूर्ण रेणू त्या जीवाची विशेष ओळख असतात. जसे एखाद्या साडीला आपण मोरांची कलाकुसर पाहिल्यावर लगेच पैठणी म्हणून ओळखतो, गोल लहान ठिपके, गडद रंग हे बांधणी प्रकारची साडी ओळखायला उपयोगी पडतात. तसे हे रेणू त्या पेशींना ओळखायला उपयोगी पडतात. यांनाच ‘अँटीजेन’ हि संज्ञा वापरली जाते. शरीरात शिरलेल्या कुठल्याही अपायकारक घटकांचे कण, सूक्ष्मजीवांनी स्त्रवलेली विषारी रसायने हे सुद्धा अँटीजेन होय. थोडक्यात म्हणजे आपल्या संरक्षण संस्थेला हल्ल्यास उद्युक्त करणारा कुठलाही घटक अथवा त्याचा भाग हा अँटीजेन ठरतो. आपण टीव्हीवर ज्या पौराणिक मालिका बघतो त्यात राक्षसगण त्यांच्या उग्र मिशा, लाल डोळे, डोक्यावर शिंग अशा ठराविक अवतारामुळे लगेच ओळखू येतात. हि शरीर वैशिष्टये त्यांचे अँटिजेन्स होय. मालिकेतील देव गण त्या राक्षसांवर मात करण्यासाठी खास त्यांच्यासाठी सिद्ध केलेली अस्त्रे सोडतात. अगदी तसेच आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी ह्या ‘राक्षस’ जन्तू पेशींना अथवा नकोश्या घटकांना अँटीजेन च्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ओळखतात आणि त्याविरुद्ध अँटीबॉडीची अस्त्रे वापरतात.

अँटीबॉडी हे सुद्धा प्रथिनांचे मोठे रेणू असतात. यांनाच immunoglobulin अथवा संक्षिप्त भाषेत Ig असे संबोधन आहे. या प्रथिनांच्या निर्मितीमध्ये श्वेत पेशींमधल्या B आणि T lymphocyte पेशींचा मुख्य सहभाग असतो. त्यातही आपल्या विषयाच्या रोखाने आपल्याला B पेशींची कार्यपद्धती जास्त जवळून समजून घ्यायची आहे . एखाद्या परकीय पेशीवरील अँटिजेन्स ओळखण्यासाठी आपल्या श्वेत पेशींकडे कुशल यंत्रणा असते. बाहेरून शरीरात शिरकाव केलेल्या सूक्ष्मजीव किंवा अनोळखी घटकांना आपल्या डेंड्रिटिक अथवा मायक्रोफाज नामक रक्षक पेशी फस्त करून त्यांचे विघटन करून टाकतात. या विघटनाच्या प्रक्रियेत जे लहान लहान तुकडे होतात त्यातील काही तुकडे (रेणू) या रक्षक पेशी आपल्या पृष्ठभागावर मिरवतात. हे तुकडे अँटीजेन चे काम करतात. त्यामुळे यांना Antigen Presenting Cells (अँटीजेन दर्शक पेशी) असेही संबोधले जाते. APC (Antigen Presenting Cells) या इतर श्वेत पेशींना हे तुकडे दाखवून इशारा देते कि ‘बघा मला नवीन शत्रू सापडला आहे आणि हा त्याचा एक तुकडा ओळख तपासायला तुम्हाला उपयोगी पडेल’.


B पेशी सुद्धा डेंड्रिटिक अथवा मायक्रोफाज पेशींप्रमाणे APC चे कार्य करतात. B पेशींच्या पृष्ठभागावरील विशिष्ट receptor (आकलक) रेणू परकीय घटक अथवा सूक्ष्मजीवांचे अँटीजेन ओळखायचे काम करतात. हे आकलक (receptors) म्हणजेच B पेशींची अँटीबॉडी प्रथिने होय. मात्र ते पेशी आवरणात घट्ट बसलेले असतात. असे जवळ जवळ लाखो एकसमान आकलक प्रथिने B पेशींच्या आवरणातून डोकावत असतात. मात्र B श्वेतपेशींमध्ये सर्वच पेशींवर सारख्या प्रकारचे आकलक नसतात. प्रत्येक नवीन तयार होणारी B श्वेत पेशी हि पृष्ठभागावर नवीन प्रकारची receptor वागवत असते. ज्यामुळे B पेशींमध्ये प्रचंड विविधता निर्माण होते. असं समजा कि सैन्यातील प्रत्येक सैनिक वेगवेगळे शस्त्र बाळगून आहे. एकाकडे चाकू, दुसऱ्याकडे तलवार, तिसर्याकडे पिस्तूल असे हजार सैनिक असतील तर हजार वेगवेगळी हत्यारे!!!!! ज्या B श्वेतपेशीच्या पृष्ठभागावरील आकलक (receptors) परकीय पेशीवरील अँटिजेनशी तंतोतंत जुळेल त्याच पेशीला पुढे या शत्रूच्या खातम्यासाठी नेमले जाते आणि हे receptors रक्त प्रवाहात अँटीबॉडी रूपाने स्त्रवले जातात. जशी ठराविक कुलुपाला त्याचीच चावी लागते तसाच हा अँटीजेन अँटीबॉडी संबंध असतो. त्यामुळे कितीही चित्रविचित्र अँटीजेनचा शरीराला सामना करावा लागला तरी आपल्याकडे B पेशीसुद्धा तेवढ्याच विविधतेने अँटीबॉडी वागवत असतात.





आता या अँटीजेन दर्शक पेशी (APC) (मायक्रोफाज, डेंड्रिटिक पेशी) काय करतात?  तर त्या जे शत्रूचे अँटिजेन फडकवत असतात त्याला तंतोतंत जुळणारी T पेशी सक्रिय करतात. हिला मदतगार T पेशी (Helper T cell) म्हणतात. T पेशीवरील आकलक रेणू सुद्धा असेच ‘एक कुलूप एक चावी’ प्रकारे जुळणारे असतात. आता हि सक्रिय T पेशी फिरून जाऊन अशा B पेशीला उद्युक्त करते जिच्यावरील आकलक प्रथिने (थोडक्यात अँटीबॉडीज) त्या अँटिजेनशी आधीच जुळलेली होती. एकदा हा खो मिळाला कि त्या मोजक्या B श्वेतपेशी शत्रू ओळखून विभाजनाने आपली संख्या वाढवू लागतात. हे म्हणजे एखादा अट्टल गुन्हेगाराचा एन्काउंटर APC रुपी पोलीस करतात ज्यात मायक्रोफाज, डेंड्रिटिक पेशी, B पेशी असे सर्व समाविष्ट असतात. हे त्याच्या जप्त गोष्टी, हत्यारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीला (T पेशी ) दाखवतात. त्या समितीमध्ये या हत्यारांची इत्थंभूत माहिती ज्या अधिकाऱ्याला आहे तो APC मधील अनुभवी अधिकाऱ्याला (B पेशी) हे काम सोपवतो. म्हणजे बी पेशी मूळ एन्काऊंटर तर करतेच पण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फर्मान निघाल्यावर सक्रिय होऊन आपले खास दल तयार करते जे त्या गुन्हेगारी टोळीच्या हत्यारांना प्रत्युत्तर द्यायला खास शस्त्रे बाळगून असते. हि शस्त्रे म्हणजे अँटीबॉडी प्रथिने हे आपल्याला आता समजले असेलच. B (cells) पेशी मुख्यत्वे अशा प्रकारे काम करतात. या पुन्हा पुन्हा विभाजित होऊन आता एकसारख्या अँटीबॉडी अंगावर बाळगणारे पेशींचे मोठे सैन्य तयार होते. या सैन्यातील प्रत्येकाकडे एकसारखी लाखो शस्त्रे आहेत. हे सैन्य आता या अँटीबॉडीज अस्त्रासारख्या सोडू लागतात. म्हणजेच आपल्या पृष्ठभागावरील आकलक आता स्त्रवण्यास सुरु करतात. यांना आता ‘प्लाज्मा B पेशी’ संबोधतात. प्रचंड मोठ्या संख्येने या विशिष्ट अँटीबॉडी (Ig) शत्रू पेशींना वेढून टाकतात. शरीराची संरक्षक यंत्रणा अशा वेढलेल्या पेशी अथवा परकीय पदार्थ नष्ट करायला मदत करते. या विभाजित बी पेशींपैकी काही राखीव दलात असतात. त्यांना ‘मेमरी सेल्स’ (स्मृती पेशी) म्हणतात. या पेशी प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घेत नाहीत पण त्या हा शत्रूगट लक्षात ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे शरीरात फिरत राहतात. आपलं भरारी पथक कि हो! भविष्यात कधीही याच परकीय पदार्थाचा शरीरात प्रवेश झाला कि त्यावरील अँटीजेन या पथकातील सदस्यांच्या अँटीबॉडीशी लगेच जुळतात. हा आता दुसरा हल्ला असल्याने हि मॅच मेकिंग जलद होते आणि मग या राखीव पेशी जलदगतीने विभाजित होऊन आधी पेक्षा जास्त प्रमाणात अँटीबॉडी स्त्रवतात. जर पहिल्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला ७-८ दिवस लागले असतील तर हा दुसऱ्या हल्ल्यात २-३ दिवसात त्याहून मोठे सैन्यदल अँटीबॉडी रुपी शस्त्र घेऊन सज्ज होते. बी पेशींप्रमाणे टी पेशी सुद्धा श्वेतपेशींचा भाग आहेत. या मुख्यतः संसर्ग झालेल्या अथवा क्षतिग्रस्त शारीरिक पेशींना नष्ट करण्याचे कार्य करतात. टी पेशींची कार्यपद्धती अधिक विस्तृत आणि गुंतागुंतीची आहे. मगाशी सांगितल्या प्रमाणे ठराविक अँटीबॉडीच्या बी पेशी विभाजित होण्यास टी पेशींचा हातभार असतो.






अँटीबॉडी किंवा Immunoglobulin प्रथिनांमध्ये सुद्धा रेणवीय रचने नुसार ५ प्रकार असतात. संक्षिप्त स्वरूपात Ig असे सम्बोधीत होणाऱ्या या प्रथिनांची IgM, IgG, IgA, IgE आणि IgD अशा पाच प्रकारात वर्गवारी होते. कुठल्याही पहिल्या नवीन संसर्गानंतर IgM प्रकारच्या अँटीबॉडी तयार होतात. IgG सगळ्यात मुबलक प्रमाणात शरीरात आढळतात. IgE शरीरात allergic response दाखवताना निर्माण होतात. अँटीबॉडी ने घेरलेल्या जंतू पेशी अथवा धोकादायक परकीय घटक पुढे वेगवेगळ्या प्रकारे नष्ट केले जातात. या प्रथिनांच्या आवरणामुळे अशा सूक्ष्मजीवांची अथवा परकीय पदार्थांची कार्यक्षमता संपुष्टात येते. त्यांचा पृष्ठभाग झाकला गेल्यामुळे ते आपल्या निरोगी पेशींवर पकड घेऊ शकत नाहीत. काही वेळा या अँटीबॉडी हा आपल्या इतर सैनिक दलाला इशारा असतो. ज्यामुळे मॅक्रोफेज, नॅचरल किलर सेल्स (नैसर्गिक मारक पेशी ) असे इतर सैन्य अधिकारी येऊन हा नकोसा कचरा गिळणकृत करून साफसफाई करतात. काही वेळा हे इम्युनोग्लोब्युलिन्स या कचऱ्याला एकत्र चिकटवायला कारणीभूत ठरतात त्यामुळे ते जड आणि आकाराने मोठे होऊन मुख्य प्रवाहातून वेगळे होतात (precipitate). पुढे यकृत अथवा किडनी द्वारे याची विल्हेवाट लावली जाते.


सारांश :

आपल्याला आतापर्यंत समजलेल्या गोष्टींचा आपण थोडक्यात मागोवा घेऊ.


  • परकीय घटक अथवा सूक्ष्मजीव (जीवाणू, विषाणू) आपल्या पृष्ठभागावर आणि अंतर्भागात विशिष्ट आकाराचे मोठे प्रथिन अथवा ग्लायकोप्रोटीन चे रेणू बाळगतात. ज्यांना अँटीजेन हि संज्ञा वापरली जाते. हे अँटीजेन त्या त्या जीवाची निश्चित ओळख असतात. ते दुसऱ्या सूक्ष्मजीवांच्या अँटीजेनशी साम्य दाखवत नाहीत.
  • आपल्या संरक्षण संस्थेला आव्हान देणारा कुठलाही घटक किंवा त्याचा भाग हा अँटीजेन होय.
  • आपल्या शरीराच्या संरक्षण संस्थेतील B श्वेतपेशी आणि T श्वेतपेशी हे या परप्रांतीयांचे ओळखपत्र तपासण्याचे काम करतात.त्यासाठी त्यांच्या पृष्ठभागावर मोठे प्रथिनांचे रेणू असतात. ज्याला आकलक (receptor) असे संबोधले जाते. नवीन तयार होणारी प्रत्येक B पेशी स्वतःचे विशेष आकलक रेणू अंगावर वागवत असते, जे दुसऱ्या नव्या बी पेशीवर आढळत नाहीत. सक्रिय B पेशी हे आकलक अँटीबॉडी रूपाने स्त्रवते.
  • परकीय पेशी अथवा अनोळखी घटकाचे अँटीजेन रक्षक पेशी ओळखतात आणि त्या परक्या घटकाला फस्त करून त्याचे तुकडे पृष्ठभागावर सर्वांना दाखवायला ठेवून देतात. ज्या T पेशींच्या receptor शी हे अँटीजेन जुळतात त्या सक्रिय होऊन पुढे तेच अँटीजेन ओळखणाऱ्या B lymphocyte ला उदयुक्त करतात. आता बी पेशी सक्रिय होऊन जलद विभाजित होऊ लागतात आणि या नवीन विभाजित पेशी पृष्ठभागावरील प्रथिने (antibodies) स्त्रवण्यास सुरु करतात.त्यांना प्लास्मा B पेशी म्हटले जाते. विभाजित B पेशींमधील काही पेशी ‘राखीव दल’ म्हणून काम करतात त्यांना स्मृती पेशी (memory cells) म्हणतात.
  • हा पहिलाच हल्ला असल्याने योग्य lymphocyte ची गाठ पडणे, अँटीजेन receptor जुळवाजुळव, त्यातून साखळी प्रक्रियेने श्वेतपेशी विभाजन आणि त्या शत्रुसाठी एकसमान शस्त्र (अँटीबॉडी) धारण केलेले सैन्य उभे करणे यात आठवडा दोन आठवडे जाऊ शकतात. तेवढा वेळात आपण आजाराच्या लक्षणातून जात असतो कारण तो पर्यंत आपल्या बऱ्याच पेशींवर हल्ला झालेला असतो.
  • एकदा अँटीबॉडी (इम्युनोग्लोब्युलिन) तयार झाल्या कि त्या वेगवेगळ्या प्रकारे अँटीजेन व पर्यायाने शत्रू घटक नियंत्रणात आणतात. इथे आपण आजारातून बरे होऊ लागतो.


यापुढे त्या अँटीबॉडीचे काम संपल्याने प्लाज्मा B पेशींची संख्या घटते आणि अँटीबॉडीजचा आकडा नियंत्रणात येतो. मात्र राखीव दलाचे सदस्य (मेमरी सेल्स ) स्मृती पेशी कायमस्वरुपी शरीरात फिरत राहतात. भविष्यात त्याच अँटीजेनवाल्या शत्रूचा हल्ला झाल्यास हे दल तत्परतेने जुनी ओळख लक्षात घेऊन अतिशय जलद सैन्य उभे करून भरपूर अँटीबॉडी शस्त्रनिर्मिती करतात.आता याला आठवडे न लागता 2-3 दिवसात पहिल्यापेक्षा खूप मोठी संरक्षण फळी उभी राहिल्याने आजाराची लक्षणे निर्माण होण्यापूर्वीच शत्रू गारद होतो. हेच तत्व लस बनवताना वापरात येते म्हणून हि रोगप्रतिकारक यंत्रणेची तोंडओळख तुम्हाला करून देणे गरजेचे होते. या पुढील भागात लसीचे कार्य, प्रकार, बनण्याची प्रक्रिया याची माहिती घेऊ.


आपला मित्र,
विक्रांत घाणेकर





क्रमशः

Comments

  1. छान माहिती

    ReplyDelete
  2. सोप्या भाषेत छान माहिती

    ReplyDelete
  3. Very informative

    ReplyDelete
  4. Omg, such a nice information in simple words!

    ReplyDelete
  5. चांगली माहिती

    ReplyDelete
  6. Khup sundar mulana smjnyasathi atisshay chan

    ReplyDelete
  7. छानच माहिती

    ReplyDelete
  8. सरळ आणि मुद्देसूद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

टोळ धाड: एक आश्चर्यकारक जागतिक समस्या

२६ एप्रिलची काळरात्र (भाग १)

लसीकरणाचे स्पष्टीकरण (उत्तरार्ध)