कोरोना: समज गैरसमज


एखाद्या विषाणूचा आकार केवढा? तर जिवाणू पेक्षा जवळ जवळ सहस्त्र पट लहान. उदाहरणच द्यायचं झालं तर असं बघा कि १ मीटर हे लांबीचे परिमाण आपल्याला माहित आहे. सर्वसाधारण माणसाची उंची ६ फूट मानली तर कमरेपर्यंत उंची १ मीटर होते. आता या मीटरभर लांबीचे हजार समान तुकडे केले तर आपल्याला १ मिलीमीटर चा एक तुकडा मिळतो. त्याचे आणखी १००० तुकडे करा. आता प्रत्येक तुकडा एक मायक्रोमीटर लांबीचा आहे. जिवाणूंची सरासरी लांबी १ ते १० मायक्रोमीटर मध्ये भरते. आपल्याला जीवाणू प्रयोगशाळेतील प्रकाशी सूक्ष्मदर्शी खाली पाहता येऊ शकतो. पण तो सुद्धा दिसतो रव्याच्या कणाइतका. आता या एका मायक्रो मीटर चे समान १००० भाग केले कि एक भाग एक नॅनोमीटर  होईल. विषाणूचा आकार २० ते २०० नॅनोमीटर  मध्ये भरतो. एवढा सूक्ष्मातिसूक्ष्म आकार तर साध्या सूक्ष्मदर्शितही दिसू शकत नाही.  


मीटर ते nanometer आकाराची तुलना दर्शवणारा तक्ता 
असा हा अति सूक्ष्म विषाणू जीवाणूला सुद्धा मारू शकतो. असं काय भयानक हत्यार आहे या सूक्ष्मजीवांत?... तीव्र आम्ल ? पाचक विकरे? विषारी डंख ? नाही. मुळात याला जीव म्हणावे का हाच प्रश्न आहे. याची संरचना अतिशय सोपी आहे. एका प्रथिनयुक्त डबीत (कॅप्सिड) बंद केलेला RNA  अथवा DNA  गुणसूत्रांचा तुकडा  आणि त्या डबीवर मेद ,प्रथिन, शर्करा यांच्या संयुगाने बनलेलं संरक्षणात्मक आवरण  (envelope )एवढी साधी शरीर रचना असल्याने 'जीव' या संज्ञेत  बसणे  मुश्कीलच आहे. त्यामुळे हा वाढ आणि पुनरुत्पादनासाठी परावलंबी असतो. आपल्या गुणसूत्रात शिकार पेशींचा ताबा कसा मिळवायचा आणि स्वतःच्या 'झेरॉक्स कॉपी' कशा बनवायच्या एवढीच माहिती घेऊन हे मुक्त संचार करतात. एखाद्या योग्य अशा जिवन्त पेशीत प्रवेश केला कि हा  त्या पेशींची गुणसूत्रे आणि स्वतःची गुणसूत्रे यांचा योग्य मेळ साधून सर्व यंत्रणा  गुलाम करून घेतो. आता स्वतःच्या हजारो प्रति तयार करणे एवढेच काम करायचे असते. मग त्या पेशीचेच सर्व साहित्य वापरून हे काम पार पडले जाते.  हे सर्व सैन्य तयार होऊन हजारो ताज्या दमाचे विषाणू नवीन पेशींवर झेप घेतात. यजमान पेशी या जीवघेण्या हल्ल्यात वाचणे अशक्यच. विषाणूचे वैशिष्ट्य असे कि अत्यन्त साधी सोपी रचना असल्यामुळे त्याच्या लहानखुऱ्या गुणसूत्रात बदलही (mutation) चटकन होतात आणि त्यामुळे थोड्या फार वातावरणाच्या वैविध्याला जुळवून घेणे याला जास्त अवघड नसते. यामुळेच विषाणूचा प्रसार रोखणे अवघड होऊन बसते.

सध्या पूर्ण मानवजातीला गुडघे टेकायला लावणाऱ्या कोविड १९ विषाणू ला शास्त्रीय पद्धतीने समजून घेण्यासाठी मुळात विषाणू काय आहे हे आपण माहित करून घेणे गरजेचे वाटले म्हणून हि सविस्तर प्रस्तावना. बाकी याचा थैमान आपण पाहतो आहोच. रस्ते, शाळा, ऑफिसेस ओस पडली आहेत. दळणवळण  पूर्णपणे ठप्प झाले आहे. फेस मास्क आणि सॅनिटायझर यांचा तुटवडा भासतोय. आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबतेय. सोशल आयसोलेशन अर्थात सामाजिक विलगीकरणाला प्राधान्य दिले जातेय. पण दुसरीकडे बऱ्याच गैरसमजांचा धुरळा उडतोय. फेसबुक, व्हॉट्सएप  वरून हा धुरळा अगदी नाकातोंडात शिरलाय. त्याचा हा परामर्श:

अफवा १. हा विषाणू कुठल्याही पृष्ठभागावर १२ तास पेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही.

COVID 19 चा  विषाणू जास्त दिवस सुद्धा  तग धरून  राहू शकतो. वेग वेगळ्या पृष्ठभागावर त्याचे जिवंत  राहण्याचे  तास ठराविक असतात असा काहीच शोध अजून लागलेला नाही.

अफवा २. हा विषाणू मासे, कोंबडी यातून पसरतो त्यामुळे मांसाहार वर्ज्य करणे योग्य होय.


विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना रोगप्रतिकार क्षमता चांगली असलेली माणसे तुलनात्मक रित्या जास्त सुरक्षित असतात. चांगल्या रोगप्रतिकार क्षमतेसाठी शरीराला प्रथिनांचा योग्य पुरवठा गरजेचा असतो. मांसाहारातून हा पुरवठा जास्त प्रमाणात होऊ शकतो. आपल्याकडे  सर्वच पाक कृतींमध्ये मांस बनवताना ते खूप जास्त तापमानाला उकळून, शिजवून अथवा तळून बनवले जाते. त्यामुळे अशा अन्नात विषाणू टिकून राहण्याची शक्यता नगण्य बनते. विदेशात कोल्ड कट्स हा प्रकार प्रचलित असल्याने त्यात जन्तु टिकून राहण्याचा धोका संभवतो.

अफवा ३. हा विषाणू मोठ्या आवाजाने, टाळ्या वाजवून अथवा ठराविक नाद निर्माण करून नष्ट केला जाऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटना अशा कुठल्याही दाव्याचे समर्थन करत नाही. असा कुठलाही उपाय लागू पडेल हे शास्त्रीय संशोधनात आढळून आलेले नाही. कोविड १९ आजार पसरवणारा हा कोरोना गटातील विषाणूंचा भाऊबंद आहे. या गटातील विषाणू सर्वसाधारण सर्दी, खोकला, हिवताप पासून ते अगदी सार्स ,मर्स या सारख्या श्वसनसंस्थेच्या आजारांना कारणीभूत असतात. हे आजारसुद्धा नुसत्या मोठ्या आवाजांनी किंवा मंत्र उद्घोषाने बरे होत नाहीत हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही.

अफवा ४. लसूण दालचिनी उकळून ते पाणी प्या, सतत गरम पाणी पिऊन शरीराचे तापमान जास्त ठेवा म्हणजे विषाणू टिकणार नाही.

WHO तर्फे हे जाहीर करण्यात आले आहे कि लसूणादि गोष्टी या विषाणू वरील उपाय नव्हेत. सतत गरम पाणी पिऊन आपण शरीराचे तापमान वाढवू शकत नाही. आपली शरीर यंत्रणा हि तापमान ३७.० से. च्या जवळपास राहण्यासाठी कायम  कार्यरत असते त्यामुळे ठरवून तापमान बदल करणे आपल्याला शक्य होत नाही. यामुळेच आपण स्थिरतापी (Homeotherm) प्राणी गटात मोडतो. आपले शारीरिक तापमान जर खाद्यपदार्थाच्या तापमानावर अवलंबुन असते तर आईस्क्रीम अथवा कढत चहा प्यायल्यावर तापमान  बदलाने आपल्या अंतर्गत जीवरासायनिक क्रिया ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला असता. परंतु तसे होत नाही कारण आपल्या मेंदूतील तापमापक केंद्र अनैच्छिक रित्या तापमान नियंत्रण करत राहते. 

अफवा ५.  हा विषाणू हवेतून पसरू शकतो.

कोविड १९ चा विषाणू मुख्यतः आजारी माणसाच्या शिंकेतून अथवा खोकल्यातून उडणाऱ्या द्रव तुषारांद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो.  अशा आजारी व्यक्तीने आपल्या चेहऱ्याला, नाकाला, तोंडाला लावलेले हात जर कुठल्या पृष्ठभागाला लावले तर तिथे सुद्धा हा विषाणू टिकून राहतो आणि तिथून स्पर्शाद्वारे  दुसऱ्याला संक्रमीत होतो. त्या व्यक्तीच्या  नाक, तोंड अथवा डोळे अशा 'प्रवेशद्वारांमधून'  श्वसन संस्थेत दाखल होतो. यासाठीच साधी खबरदारी म्हणजे आजारी व्यक्तीने मास्क लावणे आणि निरोगी व्यक्तीने घराबाहेर असताना आपल्या चेहऱ्याला हात लावणे कटाक्षाने टाळणे. वारंवार साबण लावून हात धुतल्यास या संक्रमणाला आळा  बसण्यास मदत होऊ शकते. कारण  साबण या विषाणूचे मेदयुक्त संरक्षण कवच मोडून त्याला नष्ट करू शकतो. आता इथे गोम अशी आहे कि आजारी व्यक्तीला संक्रमण झाल्यापासून आजाराची दृश्य लक्षणे दिसायला  कमीत कमी २ ते जास्तीत जास्त १२-१४ दिवस  लागतात. हे त्याच्या रोगप्रतिकार क्षमतेवर अवलंबुन असते.  त्यामुळे आपण निरोगी आहोत अशाच समजाने हि  माणसे सर्वत्र वावरतात.  पण या काळात हि व्यक्ती विषाणू  वाहक असते. ती सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास स्पर्शातून मोठ्या प्रमाणात रोगाचा फैलाव करू शकते.  या गोष्टीचा वाहकाला अंदाज येऊच शकत नाही. त्यामुळे यावर अंतिम उपाय म्हणजे  सामाजिक विलगीकरण.  लोकांनी एकमेकापासून दूर राहणे हा सुरक्षित मार्ग आहे.




अफवा ६. भारतासारख्या उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात या विषाणूचा टिकाव लागू शकत नाही. समशीतोष्ण अथवा थंड वातावरणात याचा प्रादुर्भाव जास्त आहे.

या दाव्याशी संबंधित कुठलाच पुरावा WHO  समोर आलेला नाही. त्यामुळे याबाबत  निश्चित आकडेवारीने असेच सांगता येते कि हा विषाणू सर्व वातावरणात टिकून आहे. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही.

अफवा ७. तरुण माणसांना याचा त्रास कमी असून वृद्ध लोकांना जास्त धोका आहे.

या विकाराचा धोका सर्वांना समान असून त्यात वयामुळे फरक संभवत  नाही. एखादा तरुण ज्याची प्रतिकारशक्ती क्षीण आहे तो बळी  पडू शकतो आणि एखादी वृद्ध व्यक्ती जिची रोगप्रतीकार क्षमता उत्तम आहे ती याला चांगल्या प्रकारे सामोरी जाऊन लवकर बरी  होऊ शकते. ज्या माणसांना काही पूर्व आजार आहेत जसे उच्चं  रक्तदाब, मधुमेह , दमा, रक्तक्षय (ऍनिमिया ) ज्यामुळे नैसर्गिक प्रतिकार क्षमतेवर मुळातच ताण आहे अशा लोकांना संसर्गाची शक्यता वाढते.

अफवा ८.  ठराविक रक्तगट असलेल्या व्यक्ती याला जास्त बळी पडत आहेत. 

हा अपसमज आहे. कारण कोरोना विषाणू मुख्यतः श्वसन संस्थेच्या पेशींना संसर्ग करतो, रक्तपेशींना  नव्हे. त्यातूनही विशिष्ट रक्तगट ओळखण्यासाठी लागणारी प्रथिन संयुगे त्याच्या पृष्ठभागावर उपलब्ध नसतात. त्यामुळे कुठल्याही ठराविक रक्तगटाची माणसे संसर्गातून वगळली जात नाहीत अथवा जास्त धोक्यात आहेत असे होत नाही.

अफवा ९.  काही प्रतिजैविके (antibiotics) या विषाणू संसर्गावर उपयोगी ठरत आहेत.

प्रतिजैविके हि जिवाणूजन्य आजारांमध्ये वापरली जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर  ठराविक जिवाणू (बॅक्टरीया) आपली स्वतःची संरक्षक द्रव्ये निर्माण करतात जी इतर प्रकारच्या जिवाणूना मारक ठरतात.  हि द्रव्ये वेगळी करून त्याची प्रतिजैविके बनवतात. थोडक्यात 'दुष्मन का दुष्मन हमारा दोस्त बन जाता है' . मात्र सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे विषाणू हे जिवाणूच्या हजार पट लहान असल्याने आणि त्याची रचना वेगळी असल्याने प्रतिजैविके निष्प्रभ ठरतात. काही विषाणूजन्य आजारात डॉक्टर प्रतिजैविके देतात कारण ठराविक  आजारात दुय्यम जीवाणू संसर्ग टाळायचा असतो.  परंतु हे निदान डॉक्टरच योग्य वेळी करतात.

समाज माध्यमांचा प्रभाव:

फेसबुक, whatsapp अशा समाज माध्यमातून आजकाल सतत प्रबोधनाचे संदेश आणि व्हिडीओ फिरत आहेत. कोरोना ग्रस्त पेशन्टचे नावासकट अनुभव, युरोपीय देशातील परिस्थिती विशद करणारे लेख, पोलीस कमिशनर अथवा  हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर यांचे समाजाला उद्देशून मनोगत इत्यादी  बरेच प्रकार वाचायला, पहायला मिळत आहेत. या सर्व सततच्या माध्यम माऱ्याने एक तर माणसांमध्ये टोकाची घबराट अथवा कमालीचा बेफिकीरपणा  असे ध्रुवीकरण होताना दिसतेय. आपल्याला काहीच होणार नाही पासून आपण आता वाचणार नाही अशा  टोकाच्या भावना निर्माण व्हायला हि बहुमूल्य (?) माहिती हातभार लावते. याबाबत लोकांनी थोडे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. मोबाईल वर आलेली माहिती शहानिशा न करता पुढे ढकलणे बंद केले पाहिजे. हि समाजसेवा करण्याची भावना अफवा पसरवण्यास कारणीभूत ठरते.

  • चालू घडामोडी च्या माहितीचा योग्य स्रोत निवडा. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रे,  शासकीय  संकेत स्थळे योग्य माहिती पुरवू शकतात. 
  • पोलीस अधिकारी, डॉक्टर्स हे सामाजिक संदेश देण्यासाठी दूरचित्रवाणी  (TV )अथवा  आकाशवाणी (रेडीओ) हि माध्यमे निवडतात , whatsapp  अथवा इतर संदेश पाठवणारी app नव्हे हे लक्षात घ्या. 
  • जागतिक आरोग्य संघटनेचे संकेतस्थळ कोविड १९ बाबत देशोदेशीची माहिती उपलब्ध करून देत आहे. सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी, गैर समज, प्रसार रोखण्यासाठीचे उपाय असे सर्व पर्याय तिथे सविस्तर दिलेले आहेत. (https://www.who.int/)
  • आपल्या शहरातील घटना जाणून घेताना बातम्यांची योग्य ऍप्स  वापरा. शासकीय दूरदर्शन वाहिन्या कमी वेळात  प्रमाणित माहिती पुरवतात. त्यांचे सुद्धा ऍप्स  मोबाईलवर आहेत. उदा. newsonair हे प्रसारभारतीचे app. 
  • एखाद्या माहितीची खात्री करून घ्यायची असल्यास दोन तीन संकेतस्थळे तपासून सत्यासत्यता पहा. गूगल  त्यासाठी आपल्या सेवेला हजर आहेच. 
सर्वात शेवटी हीच विनंती आहे कि आपण कुठल्याही अवैज्ञानिक उपायांना बळी न पडता स्वतः सुजाण होण्याचा प्रयत्न करूया. सामाजिक विलगीकरण पाळणे आणि काटेकोर वैयक्तिक स्वच्छता राखणे एवढेच आपल्याला करायचे आहे.  सामाजिक भान राखून आरोग्य सेवेवर आणि सुरक्षा प्रणालीवर अधिक भार येऊ न देणे आपले कर्तव्य आहे.  त्याहून महत्वाचे म्हणजे स्वतःचा आणि कुटुंबाचा  निरोगीपणा जपणे. हि जबाबदारी योग्य रित्या पार पाडूया. 

आपला मित्र,
विक्रांत घाणेकर. 
























Comments

  1. लेखाची रचना सुंदर।

    ReplyDelete
  2. very informative. Thanx Vikrant.

    ReplyDelete
  3. Wow.. sundar
    Sundar lekh.. माहितीपूर्ण

    ReplyDelete
  4. Changalya ani sopya shabdat savistar mahiti..

    ReplyDelete
  5. मुद्देसूद आणि सरळ सोपे

    ReplyDelete
  6. Good blog bro! Not much info maybe available in Marathi.

    ReplyDelete
  7. विक्रांत,

    तुझा लेख वाचला, खुपच चांगली माहिती मिळाली, असलेले गैरसमज दुर झाले आणि Corona बद्दल असलेली बरीचशी भीती पण दूर झाली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

टोळ धाड: एक आश्चर्यकारक जागतिक समस्या

२६ एप्रिलची काळरात्र (भाग १)

लसीकरणाचे स्पष्टीकरण (उत्तरार्ध)